केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील जनतेचा अपेक्षाभंग केला – सुनील तटकरे

02 Feb 2017 , 12:57:19 AMमध्यमवर्गीयांना, व्यापाऱ्यांना आयकारात सूट देऊन खुश केले, परंतु सरकारने जनतेच्या डोक्यावर एक्ससाईज, सेस, सरचार्ज या सारख्या अप्रत्यक्ष कराचा भार मात्र ठेवला आहे. हे म्हणजे एका हाताने खाऊ घालायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारचा २०१७-१८ सालचा ३.२ टक्के वित्तीय तूटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पात आम्ही हे करू, ते करू अशा आश्वासनांची फक्त खैरात दिसली. २०१९ पर्यंत एक कोटी लोकांना घरे देणार असल्याचे जेटली म्हणाले. याआधी २०२२ पर्यंत परवडणारी घरे निर्माण करणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मग दोन वर्षात किती घरे निर्माण झाली, याचीही माहिती सरकारने द्यायला हवी होती.
एक कोटी कुटुंबे गरिबीमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे, पण गरिबीमुक्तीसाठी नक्की उपाययोजना काय आहे? याची माहिती मात्र अर्थमंत्र्यांनी दिली नाही. नोटाबंदीमुळे, ज्या नागरिकांचा बँक, एटीएमच्या रांगेत बळी गेला त्यांना आर्थिक मदत तर दूरच राहिली पण साधी श्रद्धांजली सुद्धा सरकारने वाहिली नाही अशी खंत तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनामधून सरकारची कोणतीही दृष्टी दिसून येत नाही. 'मनरेगा' या योजनेबद्दलही सरकारचा मूलभूत गैरसमज दिसून आला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही घोषित करण्यात आलेली नाही, रोजगार निर्मितीसाठीही नव्या कल्पना मांडलेल्या नाहीत असे ते म्हणाले. या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

संबंधित लेख