आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुर्दैवाने कोणत्याच गोष्टींचा खुलासा झाला नाही-. जयंत पाटील

02 Feb 2017 , 08:15:42 PM


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा देशाच्या इतिहासातील रेल्वे आणि अर्थ एकत्रितपणे मांडलेला पहिला अर्थसंकल्प होता. त्यामुळे यामध्ये काही नाविन्य असेल अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुर्दैवाने कोणत्याच गोष्टींचा खुलासा झाला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा देशातील जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी आज फेसबुकवर जनतेशी लाईव्ह संवाद साधताना व्यक्त केली. आज पाटील यांनी अर्थसंकल्पाबाबतचे प्रश्न, मुंबईवर अर्थसंकल्पाचा काय परिणाम होईल? रेल्वे अर्थसंकल्प एकत्र का केला? नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहेत? अशा विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकरी,कामगार,शेतमजूर,व्यापारी आणि मध्यमवर्गीय जनता या सर्व घटकांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने फक्त डिजिटल इंडियावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र डिजिटल इंडियामध्ये फक्त ३% लोक सहभागी झाले आहेत .या देशात नोटाबंदीच्या नंतर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. ६.५% जीडीपी घसरला आणि त्याचा परिणाम लाखो लोकांचा रोजगार जाण्यात झाला. देशात नवीन गुंतवणूक यायची थांबली, देशातील व्यापार, उद्योगधंदे यावर फुलस्टॉप लागला, असे पाटील म्हणाले. या बजेटद्वारे न शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला, न रोजगार निर्मितीसाठी काही निर्णय घेतला, न नोटाबंदीद्वारे निर्माण झालेल्या बेरोजगारीबाबत उपाययोजना आखण्यात आली, ना महागाई कमी करण्याबाबत काही ठोस पाऊले उचलली, त्यामुळे केंद्र सरकारच्या या बजेटला १० पैकी ३ मार्क देता येईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख