'सलाम पवार!' राष्ट्रपतींचे गौरवोद्गार

11 Dec 2015 , 07:44:25 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही पवार साहेबांच्या कारकीर्दीचे गुणगान सांगितले व त्यांच्या राजकीय तसेच प्रशासकीय कौशल्याला खुलेपणाने दाद दिली.

शरद पवार हे आपल्या काळातले एक अनन्यसाधारण नेते असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. प्रथमतः केंद्रीय संरक्षण मंत्री कृषिखाते मागत असल्याचे आपल्याला आश्चर्य वाटले होते. मात्र शरद पवार यांच्या धोरणांमुळेच कृषिक्षेत्रात भारताने नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना पवार यांनी कृषिउत्पन्नात वाढ होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना दाद देताना पवार साहेबांच्या धोरणांमुळेच गहू आणि तांदुळाचा आयातदार असणारा भारत या धान्यांची निर्यात करू लागल्याचे मान्य केले. 

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलींच्या दरम्यान शरद पवार यांनी राज्याची सूत्रे हातात घेऊन शांतता प्रस्थापित केली, या गोष्टीची आठवण काढत 'सलाम पवार' अशा शब्दांत पवार साहेबांचा गौरव केला.

उपराष्ट्रपतींनीही आपल्या भाषणातून पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीची आठवण काढत अमृतमहोत्सवी जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शरद पवारांनी केंद्रातील बहुतेक सर्व महत्त्वाची खाती अतिशय यशस्वीपणे हाताळल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. राज्यसभेत कुठल्याही कठीण वा तिरकस प्रश्नाला बगल न देता पवार यांनी कायम त्या प्रश्नांना उत्तरे दिली असल्याची आठवणही अन्सारी यांनी सांगितली. पवार कायमच स्वतःच्या तत्वांवर जगले असून त्यांच्या आत्मचरित्राला असलेले 'ऑन माय टर्म्स' हे नावच सुयोग्य असल्याचे ते म्हणाले. पवार हे सामाजिक जीवनातले आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गार अन्सारी यांनी काढले.

संबंधित लेख