मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ

06 Feb 2017 , 03:33:00 AMमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला. या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. विद्या चव्हाण, आ. किरण पावसकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि इतर पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विकासात्मक बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईच्या संपत्तीमध्ये भर घालणाऱ्या कष्टकऱ्यांना, मराठी माणसांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असून सर्वसमावेशकता हेच राष्ट्रवादीचे सूत्र असल्याचे ते म्हणाले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या पापात सेना-भाजप या दोन्ही पक्षांची संमती असून त्यामुळे जनतेने या दोहोंनाही बाजूला ठेवले पाहीजे. मुंबई ही मिनी इंडिया आहे. इथे जर सेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं तर हा संदेश व परिवर्तनाची लाट देशभर जाईल, अशी खात्री पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी उच्च शिक्षित महिलांना उमेदवारी दिली असल्याचे जाहीर करत स्त्रियांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी पुणे महानगर पालिकेच्या विकासाची उदाहरणे देत मुंबई महानगरपालिकेतील ढिसाळ कारभार उघड केला, तसेच मुंबईत माफियाराज बोकाळला असल्याची टीका केली. मुंबईकरांनी एक संधी राष्ट्रवादीला द्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तर खा. प्रफुल पटेल यांनी सेना-भाजपने मुंबईला भकास केलेअसून त्यांना मुंबईच्या विकासाबाबत काहीही देणे-घेणे नसल्याची टीका केली. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचा आरोप केला. राज्यात अडीच वर्ष सरकार असतानाही भाजपने मुंबईच्या माफियांना जेलमध्ये का टाकले नाही? असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादी नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये बदल घडवू शकते, तर मुंबईतही ते शक्य आहे आणि त्यासाठी जनतेचा पाठींबा हवा असल्याचे ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी मुंबईतील सामान्य जनतेला लुटले जात असल्याचा आरोप करत महानगरपालिकेच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. मुंबईच्या लुटमारीत शिवसेनेसह भाजपचाही वाटा असल्याचे सांगत परिवर्तनासाठी राष्ट्रवादीच्या बाजूने कल देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुंबईकरांना सुविधा देण्यास भाजप आणि शिवसेना पूर्णतः फेल ठरली असल्याचे वक्तव्य आ. विद्या चव्हाण यांनी केले. तर आ. किरण पावसकर यांनी निवडणूक आली की मुंबई तोडली जात आहे, अशी भीती मुंबईकरांना दाखवून त्या आधारावर काही पक्ष मते मिळवतात असा आरोप केला. यावेळी चित्रा वाघ यांनी सत्तेत एकत्र असून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सेना- भाजपाला इतकी वर्ष भ्रष्टाचा-यांना सोबत का केली? हा प्रश्न केला. मुंबईच्या विकासासाठी सुज्ञ नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता आपले राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवून मुंबईच्या परिवर्तनासाठी हातभार लावण्याचे आवाहन सभेदरम्यान करण्यात आले.

संबंधित लेख