ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ

13 Feb 2017 , 04:19:30 AMठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. यावेळी कळव्यातील विकासाभिमुख जनतेचे शरद पवार यांनी कौतुक केले तसेच विकासाचा ध्यास असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिल्याबद्दल कळवा वासियांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासाचे श्रेय त्यांनी तेथील नागरिकांना दिले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता देऊन विकासाची संधी दिली. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपा मध्ये सुरू असलेल्या संघर्ष नाट्यावरही सडकून टीका केली. या प्रचार सभेस विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे, माजी मंत्री,गणेश नाईक  आ. जिंतेद्र आव्हाड, माजी खा. संजीव नाईक , ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, आ.निरंजन डावखरे, प्रमोद हिंदुराव, मनोहर साळवी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार उपस्थित होते.
गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेमुळे ठाण्यातील विकासकामांना ओहोटी लागली आहे. शिवसेना ठाणेकरांना मुलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. नवी मुंबईत एनएमएमटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७५ टक्के सवलत मिळते, मात्र टीएमटीमध्ये फक्त ५० टक्के मिळते, हा जेष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्यांनी ठराव पास करून मालमत्ता कर वाढवला होता तेच आता मतांसाठी फेरविचार करण्याची भाषा करत आहे असा आरोपही त्यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ,गेली २५ वर्ष शिवसेनेने ठाणेकरांना फक्त लुटलं आहे असा आरोप केला. इतकेच नाही तर निवडणुकीसाठी खून, खंडणीचे गुन्हे नोंदलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याची माहिती जनतेला दिला. शिवसेना येथील परप्रांतीयांना विविध प्रकारे फक्त त्रास देत आहेत. त्यांना पाण्यासारख्या मुलभूत गरजेपासून वंचित ठेवले जात आहे. टक्केवारीसाठी शिवसेनेने धरणाचे कामही रोखून ठेवले आहे. कळव्यात विकासाची कामे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. याआधीही कळवावासियांची आश्वासने पूर्ण केली आणि यापुढेही करू असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा विकास हा राष्ट्रवादीच्या प्रयत्नांनी झाला आहे आणि त्याची पुनरावृत्ती ठाणे महानगरपालिकेत कराण्यासाठी फक्त राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख