स्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस घवघवीत यश संपादन करेल – सुनील तटकरे

14 Feb 2017 , 11:51:47 PM

राज्यात निवडणूक होत असलेल्या १० महापालिका, २५ जिल्हा परिषदा तर २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश संपादित करेल, असा विश्वास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणत्याही जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी न करता समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील विविध जिल्ह्यांत काँग्रेस, शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी केली असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीयवादी पक्षाना दूर ठेवून काँग्रेस पक्षासोबतचा आघाडीचा धर्म पाळला, मात्र रायगड, उस्मानाबाद, सांगली यासारख्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने शिवसेने सारख्या जातीयवादी पक्षांशी उघडपणे युती करुन आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत सुनील तटकरे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे, तर रायगड, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड , लातूर, वर्धा आदी ठिकाणी काँग्रेस ,शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात निवडणूक होत असलेल्या १० महापालिकांपैकी मुंबई , सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड आदी महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे. तर ठाणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण १३१ जागापैकी ११६ जागी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली आहे तर १५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. पुणे महापालिकेसाठी एकूण १६२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५६ जागा व काँग्रेस ३० जागा तर ७६ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. नाशिक महापालिकेत १२२ जागांपैकी ६० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ४३ जागांवर काँग्रेस पक्ष लढत आहे. नागपूर मध्ये रिपाई सोबत आघाडी झाली असल्याची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित लेख