आबांनी आणले सिरोंचा वासीयांना 'अच्छे दिन'

16 Feb 2017 , 09:51:01 PM

सिरोंचा- गडचिरोलीतील महाराष्ट्राच्या टोकावरचा तालुका... 
येथून हैदराबाद, वारंगल, करीमनगर ही तेलंगणातील मोठी शहरे अवघ्या दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहेत. या भागातील जनतेला आरोग्यसेवा, बाजारपेठ, तसेच अनेक गोष्टींसाठी तेलंगणातील ही मोठी शहरे जवळ आहेत. मात्र या शहरांशी स्थानिकांना जोडणारा दुवा सहज उपलब्ध नव्हता. येथील गोदावरी नदीवर पूल नसल्याने जनतेला नावेने नदीच्या पलीकडे जावे लागायचे.  पावसाळयात तर नदी पार करणं अवघडच....
 
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोदावरी नदीवर पूल व्हावा अशी सिरोंचा आणि आसपासच्या गावांची इच्छा...
यासाठी वारंवार स्थानिकांनी मागणीही केली, पाठपुरावाही केला, पण पूल काही बनत नव्हता..
मात्र स्व. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले आणि सुरू झाला या नदीवर पूल बनण्याचा प्रवास...
गडचिरोलीचे पालकमंत्री असताना आबांच्या प्रयत्नांमुळे अखेर या पुलासाठी निधी मंजूर झाला आणि २०१० मध्ये पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. दोन किलोमीटर लांब असलेला या पुलाचे ३० डिसेंबर, २०१६ रोजी राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आज आबांचा द्वितीय स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने आबांनी केलेल्या या लोकाभिमुख कामाचे स्मरण गडचिरोलीतील जनतेला झाले नाही तरच नवल.. आबांमुळेच आमचे १०० वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या हयातीत आम्ही सिरोंचाच्या एसटी स्टँडमधून बस पकडून हैदराबादला जात आहोत. हा आनंद आमच्यासाठी लाख मोलाचा आहे, पुलाच्या लोकापर्णसाठी आबा असायला हवे होते, ही खंत कायम मनात राहील, असे गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार महेश तिवारी यांनी सांगितले.

संबंधित लेख