राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गार

17 Feb 2017 , 01:33:04 AM

उपाययोजना करण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पाहात आहे?
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गार
कांद्याला हमीभाव नाही, नोटाबंदीमुळे शेतमजुरांना मजुरी देता येत नाही म्हणून नैराश्यातून येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपले पाच एकर कांद्याचे उभे पीक जाळून टाकल्याची घटना ताजी आहे. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी त्याच शेतातील जळलेले कांदे मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. सरकारने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५०% इतका हमीभाव लवकरात लवकर द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आदिती नलावडे यांनी यावेळी केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादी युवतीच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सोनल पेडणेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वाती माने, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सचिव पूजा गुप्ता, जिल्हा सचिव ज्योती कांबळे, मीरा कट्टीपेरू, सुमती गायकवाड, वैशाली कांबळे, प्रदेश सदस्या कल्पना शिर्के, सुमती पवार, ऐश्वर्या गायकवाड, स्वाती कुरणे यावेळी उपस्थित होत्या.
खा. सुप्रिया सुळे यांनी लासलगावच्या दौऱ्यादरम्यान स्वतः या शेतकऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली होती. सुप्रियाताईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांना यासंदर्भातील पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पत्र निवेदन म्हणून देण्यात आले, तसेच मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील होऊन विचार करावा, अशी विनंती करण्यात आली.

संबंधित लेख