मुख्यमंत्र्यांचे धुलाई मशीन, गुंडांवर गृहखात्याची पावडर टाकली की बाहेर निघतो एक सुसंस्कृत माणूस- सुप्रिया सुळे

17 Feb 2017 , 03:27:36 AM


मुंबई निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेंकावर तोंडसुख घेण्याची कोणतीही संधी सोडत नसून टीकेने सुमार पातळी गाठली आहे. त्यामुळे एकमेकांचे पाणी काढणे ही कोणती संस्कृती? असा सवाल करत खा. सुप्रिया सुळे यांनी सेना-भाजपवर घणाघाती टीका केली. मालाड येथील सभेत सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी करत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. यावेळी आमदार विद्या चव्हाण, आमदार हेमंत टकले, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष अदिती नलावडे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह उपस्थित होते. शिवसेना-भाजपपेक्षा कोणत्याही सिरीयलमधले लोक कमी भांडत असतील, असा टोला सुळे यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात खड्डे झालेत, तर मुख्यमंत्री म्हणतात की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे ते कळत नाही, पण नेमका याच्याशी आपला संबंध काय हे लोकांनाच कळेनासे झाले आहे, असे सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी पुण्यात एक मशीन आणले आहे, त्यात गुंड घातला की इकडून मुख्यमंत्री गृहखात्याची पावडर टाकतात मग बाहेर काय निघतं तर एक सुसंस्कृत माणूस! आमच्या पुण्यात एक शेलार आहे, मुख्यमंत्र्यानी विचारले काय करतोस रे बाबा? तो म्हणाला तडीपार आहे, पाच खून केले आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी त्याचावरही गृहखात्याची पावडर टाकली आणि बाहेर आले माननीय शेलार, ज्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढला आहे, अशी कोपरखळी सुळे यांनी मारली.
राज्यातील भाजपवाल्यांना पोलीस विकले गेले आहेत, अशी टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. यावर पोलिसांबद्दल एक शब्दही काढला तर गाठ राष्ट्रवादीशी आहे, उद्धव ठाकरे जर खरंच शेर असतील तर त्यांनी मातोश्रीबाहेरचे सर्व पोलीस हटवून, माझ्या आणि विद्याताईंसारखे महाराष्ट्रात एकटे फिरून दाखवावे, पोलिसांना काही बोलले तर बायका लाटणं घेऊन काय करू शकतात, ते यांना दाखवून देऊ, असे आव्हान सुळे यांनी दिले.
शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणतात की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  'गुंडा' पार्टीचे आहेत, आता मध्यावधी निवडणुका होणार, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आणि रामदास कदम हे उपमुख्यमंत्री होणार, हे म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने आहेत, असा टोला सुळे यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी मागच्या निवडणुकीत 'वोट' घेऊन गेले आणि आता 'नोट' घेऊन गेले. यांनी विकासाच्या अनेक जाहिराती केल्या पण यांच्या जाहिराती फसव्या असतात, पुन्हा यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

संबंधित लेख