स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मा. खा. शरद पवार यांना मानद “डि. लिट.” पदवीने सन्मानित करण्यात आले

27 Feb 2017 , 09:21:54 PM


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत प्रदान समारंभात विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मी स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाड्यातील जनता आणि हैदराबादच्या मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना व हुतात्म्यांना अर्पण करतो, अशा शब्दांत पवार यांनी आपली कृतज्ञता यावेळी व्यक्त केली. पवार यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा आवर्जून आढावा घेत स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान आणि त्यांचा शिक्षणविषयक दृष्टीकोन गौरवाने नमूद केला. तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यापीठासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी त्यांनी यावेळी जाहीर केला. या निधीतून महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी शामराव कदम, तसेच पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने पुढील शैक्षणिक वर्षापासून किमान दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात यावी व त्यात किमान आठ ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि दोन विद्यार्थींनींचा समावेश असावा, असे आवाहन पवार यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

संबंधित लेख