राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार

28 Feb 2017 , 10:29:34 PMमुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये विजय संपादित केलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार किरण पावसकर आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ९ ठिकाणी विजय संपादित केला. यावेळी निवडणुकांचे समीकरण खूप वेगळे होते. या ९ जागांपैकी ८ जागी महिलांचा विजय झाला. देशात महिलांना राजकारणात स्थान देण्याचा महत्त्वाचा विचार आदरणीय पवार साहेबांनी मांडला आहे. त्या विचाराचेच प्रतिबिंब या निवडणुकीत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यामातून आज राज्यात महिला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा विजयच म्हणता येईल आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन यावेळी तटकरे यांनी केले. तसेच या निवडणुकांच्या प्रचारात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली, सत्तेचा पूर्ण उपयोग करत भाजप आणि शिवसेनेने या निवडणुका लढवल्या, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कोणतीही सत्ता नसतानाही फक्त पवार साहेबांच्या विचारांना सोबत घेऊन या निवडणुका लढवल्या आणि हे यश संपादित केले. या पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहील, असे तटकरे यांनी सांगितले. 

संबंधित लेख