अभाविपची दहशत मोडून काढणार – संग्राम कोते पाटील

01 Mar 2017 , 11:37:58 PM


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सोलापूर, औरंगाबाद, पुणे, लातूर, सांगली, जालना, नांदेड आणि राज्यातील अन्य शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरधोत आंदोलन करण्यात आले. अभाविपतर्फे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले जात असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अभाविपच्या दहशतीला मोडून काढेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिलाय. देशात अनेक सरकारं आली आणि गेली मात्र विद्यार्थ्यांवर दडपशाही आणण्याचा प्रकार कोणी केला नव्हता. सध्या मात्र दडपशाहीचा प्रयत्न केला जात असून देशाचे वातावरण बिघडवण्याचे काम भाजपतर्फे केले जात आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अभाविपचे कोणतेही मनसूबे यशस्वी होऊ देणार नाही तसेच येत्या काळात अभाविपला लोकशाही मार्गाने धडा शिकवणार असा इशारा संग्राम कोते पाटील यांनी दिला.
गुरमेहर कौर या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने अभाविपविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे गुरमेहरला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या. या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही राज्यभरात मशाल मोर्चे, मूक निदर्शने करून अभाविपविरोधात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आशिष वाघमारे, विशाल विहिरे, संकेत ढवळे, अजिंक्यराव पाटील, विशाल मोरे, अक्षय पाटील, राहुल तायडे, मयुर सोनावणे, विश्वजीत पावडे, आत्माराम कापटे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख