आयएमएसआर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये- निरंजन डावखरे

02 Mar 2017 , 11:32:13 PM

आपल्या शैक्षणिक मागण्यांसाठी गेल्या ४३ दिवसांपासून मायणी (सातारा) येथील आयएमएसआर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. बुधवारपासून या विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवत मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. परंतु अद्याप सरकारने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही अथवा सरकारचा कोणीही प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकलेला नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांनी आझाद मैदान येथील आंदोलनस्थळी जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या जाणून घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. हा प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नांला वाचा फोडणार असल्याचे डावखरे यांनी सांगितले.
आयएमएसआर मेडिकल कॉलेजच्या२०१४-१५ बॅचमधील एम. बी. बी. एस. च्या विद्यार्थ्यांचे अद्याप निकाल जाहीर केले गेलेले नाहीत. त्यामुळे पुढील प्रवेश घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना अडचणी येत असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व विनंतीअर्ज करुनही याची दखल घेतली गेलेली नाही. अखेर या विद्यार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याची आवश्यकता असल्याचे डावखरे म्हणाले.

संबंधित लेख