राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर, बुथनिहाय पक्षसंघटन मजबूत करणार – सुनील तटकरे

04 Mar 2017 , 10:08:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निकालांचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच काम करणार, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. निवडणुकांच्या काळात शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांशी कोणत्याही प्रकारची आघाडी करायची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली होती आणि या भूमिकेवर पक्ष ठाम राहिल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जि.प निवडणुकांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेले नाही, त्रिशंकू अवस्था आहे, अशा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ देणार आहे. येत्या सात तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणखी एक बैठक होईल. या बैठकीत बुथनिहाय, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर पक्ष संघटन कसं मजबूत करता येईल यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या ईव्हीएम मशीनविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले होते. विजयी झाल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं. सर्टिफिकेट मिळाल्याच्या दोन तासांनंतर पुन्हा बोलावून घेऊन मतमोजणी करण्यात आली. हे मी माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकर्दित पहिल्यांदा पाहत आहे, असे तटकरे म्हणाले. काही जण ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याबाबतही चर्चा करून भूमिका घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

संबंधित लेख