राज्यातील विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार – धनंजय मुंडे

07 Mar 2017 , 06:36:28 PM


निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेचे भांडणं पाहता हे अधिवेशन या सरकारचे शेवटचे अधिवेशन ठरेल असे वाटत होते मात्र तसं काहीच झालं नाही. खोदा पहाड निकला चुहा असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महापौर निवडणुकीत भाजपचा उमेदवार न उतरवत मुख्यमंत्र्यांनी झिंगा टाकून रावस काढला असेही ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधीपक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारने कर्जमाफीचे निर्देश द्यावे या मागणीसाठी शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आमदार शरद रणपिसे आणि आमदार संजय दत्तही उपस्थित होते.
येत्या अधिवेशनात शेतक-यांना कर्जमाफी मिळावी ही विरोधी पक्षांची प्रमुख मागणी असेल अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली. नोटाबंदीमुळे कापसला प्रतिक्विंटल १८०० रूपये तोटा झाला, तसेच महसूलात मोठी तुट निर्माण झाली आहे. येत्या अधिवेशनात याबाबात आवाज उठवणार अशी माहिती धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून वेळ काढूपणा केला जात आहे असा आरोप मुंडे यांनी केला. तसेच धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. भाजपाचे मंत्री, आमदार यांना मस्ती चढली आहे. सैनिकांच्या पत्नीचा अवमान केला जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकांच्या काळात शिवसेना-भाजपने एकमेकांवर खालच्या पातळीची टीका केली होती. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार न उतरवत भाजप शिवसेनेची मदत करत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला #DoYouRemember म्हणून त्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची आठवण करून देऊ असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेत चार हजार कोटी रुपये गुत्तेदारांवर उधळले असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. सरकारच्या स्थिर-अस्थिरतेच्या चर्चेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे हे येत्या अधिवेशनात सिद्ध करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.


संबंधित लेख