पक्ष संघटना मजबूत करा, संघर्षाची भूमिका घ्या – शरद पवार

07 Mar 2017 , 07:23:46 PM

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी संघर्षात्मक होत्या. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन कसं मजबूत करता येईल याकडे लक्ष द्यावं, तसंच जनतेच्या प्रश्नांसाठी संविधानाच्या चौकटीत राहून संघर्षाची भूमिका घ्यावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या उमेदवारांच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक , आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे यांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पैशांच्या जोरावर निवडणूक न लढवता कामांच्या जोरावर निवडणूक लढवली. सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि साधन सामग्रीचा उपयोग केला असा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणुकांच्या काळात टीव्हीवर प्रत्येक दोन मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात असायची. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर मी माझ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत कधी पाहिला नव्हता. मुंब्रा-कळवा या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे तिथे आपल्याला यश संपादित करता आले. त्याच प्रमाणे इतर प्रभागांमध्येही संघटन मजबूत केल्यास येत्या काळात यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


संबंधित लेख