जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे - जयंत पाटील

07 Mar 2017 , 11:32:29 PM


एका एनजीओने प्रकाशित केलेल्या अहवालाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज सभागृहात केला.या एनजीओने अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार सरकारने चुकीच्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामे केली आहेत असे या एनजीओचे म्हणणे असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
खासगी प्रयत्नांनी जिथे जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली त्या ठिकाणी प्रत्येक घनमिटरला साडे पंधरा रुपये खर्च झाला तर आमदार निधीतून जिथे कामे झाली त्या ठिकाणी ८२ रुपये खर्च झाला. राज्य सरकारचा मापदंड हा ३२ रुपयांचा आहे. परंतु ३२ रुपयांत होणाऱ्या कामासाठी सरकारने ८२ रुपये खर्च केले असा आरोप जयंत पाटील यांनी त्या अहवालाचा दाखला देत केला.
सरकारने ३ लाख रुपयांच्या आत कामे आणून ई टेंडरिंगशिवाय गुत्तेदारांना कामे दिली. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा आहे असे पाटील यावेळी म्हणाले. वेबसाईटवर जलयुक्त शिवार योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल अशी घोषणा सरकारने केली होती मात्र शासनाच्या इतर घोषणांप्रमाणे ही घोषणा देखील पोकळ ठरली, बेबसाईटवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही असा आरोप जयंत पाटील यांनी सभागृहात केला.

संबंधित लेख