स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील

08 Mar 2017 , 06:18:42 PM


शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी शिवसेनेचे कोणीही मंत्री अथवा आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे असे तडकाफडकी विधेयक मंजूर करून भाजप बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने विधेयक पुढे ढकलण्यात यावे, अशी सूचना आम्ही सभागृहाला केली. या विधेयकाबाबत अनेकांना मत व्यक्त करायचे आहे, म्हणून सभागृहात ज्यावेळी सदस्यांची संख्या जास्त असेल तेव्हा हे विधेयक मांडण्यात यावे असेही आम्ही सुचवले. मात्र भाजपने घाईघाईत हे विधेयक सभागृहात मांडले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हे विधेयक मांडण्यात आले, हे चित्र काही बरोबर नाही, हे सभागृहाच्या प्रथेला शोभण्याजोगे नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख