बँकांवर विश्वास नसेल तर 'पे-टीएम' मार्फत कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

10 Mar 2017 , 11:53:33 PM


शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यासाठी सरकार विविध कारणे सांगत आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सहकारी बँकांमार्फत कर्जमाफी दिल्यास नेत्यांना फायदा होत असेल तर सरकारी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा फायदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहचतो का? असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला केला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सलग पाचव्या दिवशी विधान परिषद तहकूब झाल्याने कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला.
विधान परिषदेत आज पाचव्या दिवशीही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. सभागृहात कामकाजास सुरूवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला. सभापतींनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्यावर सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे शक्य नसल्याचे सांगताच विरोधकांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी तटकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सावकारांना कर्जमाफी देणाऱ्या सरकारचा राज्यातल्या सहकारी बँकांवर विश्वास नसेल तर 'पे-टीएम' मार्फत कर्जमाफी द्या, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.
कर्जमाफीची मागणी करणारे हे ७ वे अधिवेशन – धनंजय मुंडे
दोन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता काय २५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची सरकार वाट बघत आहे का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवायचे आहे, असे सरकार म्हणते. पण यावर्षी शेतकऱ्यांचा माल दुपटीने वाढल्यावरही त्याला भाव नाही, त्याचे काय? कर्जमाफी सहकारी बँकेच्या संचालकांना गेली असे सरकार म्हणते. मग ज्या राष्ट्रीय बँकेत कर्जमाफी दिली गेली, ते पैसे अरुण जेटलींना गेले का? अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच सरकार कर्जमाफीचा निर्णय करत नाही, तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.


संबंधित लेख