शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक

15 Mar 2017 , 10:31:39 PM


शेतकरी कर्जमाफी च्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही चांगलाच गाजत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. याच मुद्द्यावरून बुधवारी विधिमंडळाचे काम सुरू होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, याच मागणीवरून विधानसभेचे कामकाज सलग तीन वेळा स्थगित झाले. स्थगितीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच, माजी आमदार स्व. चंद्रकांत देशमुख यांचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटनेते  जयंत पाटील  यांनी शोक प्रस्तावावर भाष्य केले. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. वेलमध्ये उतरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे  यांनीही या अधिवेशनातच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा कामकाज चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली.

संबंधित लेख