राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने केलेल्या आंदोलनाला यश

18 Mar 2017 , 09:24:24 PM

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने हा विषय लावून धरला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार  यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला असता शासनाने यावर सकारात्मक उत्तर दिले आहे. जिल्हा पातळीवर उपकेंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटरचे अंतर ओलांडावे लागते, परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सरकारने लेखी उत्तरात मान्य केलेले आहे. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने उपकेंद्राच्या मागणीसाठी मोर्चे काढले गेले, याचीही कबुली दिली आहे. "राज्यातील अकृषी विद्यापीठांर्गत होणाऱ्या उपकेंद्रासाठी धोरण विहित करण्यासाठी माजी प्र. कुलगुरू डॉ. योगानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशींना शासनाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे", असे लेखी उत्तर सरकारने दिले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यातील विद्यापीठ उपकेंद्रांचा प्रश्न हाती घेऊन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील  यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत सात मोर्चे काढले होते. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले असेच म्हणावे लागेल. 

संबंधित लेख