शिवसेनेचे धोरण दुटप्पी - धनंजय मुंडे

18 Mar 2017 , 11:24:05 PM


अधिवेशनाच्या सुरूवातीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, तोपर्यंत अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. याचा निषेध करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेचा वाघ आज अचानक शांत कसा झाला? असा प्रश्न मुंडेंनी केला. शिवसेनेचे धोरण दुटप्पी असून सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करायचे धोरण शिवसेनेने अवलंबले असल्याची टीका त्यांनी केली. उत्पादन या वर्षी तिप्पट झाले आहे, मात्र शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज सादर केलेले निवेदन गोलमोल आहे, त्यात कर्जमाफीबद्दल काहीही नाही, तरी शिवसेना समाधानी कशी? असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

तत्पूर्वी, विधान परिषदेत बोलताना, मुंडे यांनी कर्जामाफीची घोषणा झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. केंद्रीय कृषीमंत्री कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगतात, मग सेना-भाजपच्या शिष्टमंडळाला केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तरी ते पाळतील का? असा प्रश्न मुंडे यांनी विचारला. औरंगाबाद येथील विष्णु बुरकूल या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील निवेदन ऐकून आत्महत्या केली आहे. या सरकारने सावकारांची कर्जमाफी केली, मग बुरकूल वर सावकाराचे कर्ज कसे काय होते? विष्णू बुरकूल सारखे अनेक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सरकारकडे अजूनही वेळ आहे. अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी तरतूद करावी, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली.

संबंधित लेख