जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील

18 Mar 2017 , 11:33:10 PM


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. राज्याची आर्थिक घडी सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. शेती, शिक्षण, सामाजिक विकासासाठी नवे प्रयत्न दिसत नाहीत. कर्जमाफीच्या अपेक्षांवर पाणी सोडलेले दिसत असून महाराष्ट्राच्या माथी निराशा मारलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गाजरं दाखवणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका पाटील यांनी केली. मागील वर्षी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील ५० टक्के रक्कमह खर्च केलेली नाही, त्यामुळे आता केलेल्या घोषणा किती अंमलात येणार हा प्रश्नच आहे. अर्थसंकल्पावर ताण असल्याचे यातून स्पष्ट झाले. एकूणच अर्थमंत्र्यांनी निव्वळ सवंग लोकप्रिय अशा घोषणा केल्या असून सर्वार्थाने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख