बहुमत टिकवण्याच्या भीतीनेच १९ आमदारांचे निलंबन – जयंत पाटील

22 Mar 2017 , 11:13:06 PM


राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील १९ आमदारांचे निलंबन म्हणजे भ्याड कृत्य असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या, त्यासाठी अर्थमंत्र्यांना विनवण्या करत होते, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता प्रयत्न करत होते, अशा शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या आमदारांना भाजपने सत्तेचा उपयोग करून निलंबीत केले, असा आरोप पाटील यांनी केला. आज सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती.आम्ही या कपटी सरकारची पोलखोल करणार होतो, त्यामुळे या सरकारने घाबरून हे पाऊल उचललं आहे. आम्ही जे प्रश्न उपस्थित करणार होतो त्या प्रश्नांमुळे भाजपला आपले बहुमत टिकवताच आले नसते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले. सभागृहाच्या बहुसंख्यांक आमदारांना शेतकऱ्यांची कर्जमाफी हवी होती, मात्र सरकारने या आमदारांची मागणी मान्य केली नाही, उलट आमदारांना निलंबीत केले. आपलं बहुमत टिकावं या भीतीनेच सरकारने हे कृत्य केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख