आमदार निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

24 Mar 2017 , 12:24:27 AM

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या आमदारांना निलंबित करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आज ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणाची होळी करण्यात आली. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत आमदारांचे निलंबन मागे घेतलेच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, अर्थसंकल्पावर मतदान झाले तर त्यामध्ये विरोधकांचे मतदान जास्त होऊ नये म्हणून सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले असल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. एकूण उत्पन्नाच्या ठराविक प्रमाणात खर्च विकासकामांवर करायचे निर्देश केंद्राने दिलेले आहेत. मात्र, विकास करण्यासाठी ठेवलेले ११.२५ टक्केही खर्च केलेला नाही. कर्जफेडीवरच १५ टक्के खर्च करण्यात येत आहेत. सर्वत्र महागाई वाढली आहे. सोयाबीनचे भाव, कांदा, टोमॅटो, कापूस या शेतमालाचे दर निम्म्याहून खाली आले आहेत. तूर डाळीला योग्य भाव मिळत नाही. याबाबत फडणवीस सरकार काहीही करीत नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी आमदारांना निलंबित करुन शेतकऱ्यांची प्रतारणा केली आहे, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी सरकारचा निषेध केला.

 

संबंधित लेख