शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष काढणार संघर्ष यात्रा

24 Mar 2017 , 12:29:10 AM


सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची संयुक्त बैठक आज विरोधी पक्षनेते  राधीकृष्ण विखे पाटील  यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेकाप आणि इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते व आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांचा आवाज संपूर्ण राज्यात पोहोचवण्यासाठी येत्या २९ तारखेपासून चंद्रपूर ते सिंधुदुर्गापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आठवडाभर चालणाऱ्या या संघर्ष यात्रेचा रायगडमध्ये समारोप होईल.
विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम आहे. सरकारने निलंबीत केलेल्या आमदारांचे निलंबन मागे घेतले नाही तरी विरोधी पक्ष कर्जमाफीच्या मागणीवर ठाम राहणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. या संघर्ष यात्रेमार्फत कर्जमाफीचा मुद्दा राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू, असेही ते म्हणाले. कर्जमाफीची मागणी करणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार शेतकरीविरोधी आहे म्हणून कर्जमाफीची मागणी करणाऱ्या आमदारांना निलंबीत केले गेले, असा आरोप जयंत पाटील यांनी सरकारवर केला. विरोधी पक्ष म्हणून या सरकारविरोधात आम्ही एकत्र लढा देऊ, त्याशिवाय या सरकारचे डोळे उघडणार नाहीत असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
मग आम्हालाही निलंबीत करा...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केले म्हणून विधानसभेतील तब्बल १९ आमदारांना निलंबीत केले गेले. याचा निषेध म्हणून गेल्या दोन दिवसांपासून विरोधक सभागृहाच्या कामकाजात भाग घेत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या इतर आमदारांचीही मागणीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हीच आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील उरलेल्या आमदारांनाही निलंबीत करा, असे पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिले आहे.

संबंधित लेख