हा लोकशाहीचा चमत्कार- शरद पवार

12 Dec 2015 , 10:12:29 PM

"महाराष्ट्राच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. मी महाराष्ट्राचा ऋणी आहे," अशा शब्दांत आज आदरणीय शरद पवार यांनी आपल्या जन्मदिवशी कृतज्ञता व्यक्त केली. पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने 'आधारवड' या चित्रपुस्तिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. यावेळी पवार यांनी जनतेचे आभार मानले.

या सोहळ्यात समोर बसून आपल्याबद्दल इतरांचे विचार ऐकणे हे एक संकटच असल्याचे म्हणत असे संकट सर्वांवर येवो अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतानाच महाराष्ट्र हे देशातले महत्त्वाचे राज्य बनवण्याची कै. यशवंतराव चव्हाण यांची संकल्पना नव्या पिढीच्या सामूदायिक शहाणपणातूनच कशी होईल याची काळजी घ्यावी असा सल्लाही पवार साहेबांनी तरुण पिढीला दिला. 

यावेळी भाषणात एकीकडे काही जुन्या आठवणींमध्ये डोकावतानाच भविष्यात भारतीय लोकशाही अधिक दृढ करण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. आपल्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायला मिळाले, जग पाहाण्याची संधी मिळाली हा लोकशाहीचा चमत्कार असल्याची नम्र भावना व्यक्त करताना लोकशाहीमध्ये सामान्यांतला सामान्य माणूस कुठेही जाऊ शकतो, हे लोकशाहीने दाखवून दिले असल्याचे पवार यावेळी म्हणाले. ही लोकशाही अधिक मजबूत कशी होईल, या लोकशाहीचा सन्मान कसा राखला जाईल आणि या लोकशाहीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकालाही आपण या लोकशाहीच्या उभारणीतला एक भाग असल्याची जाण कशी निर्माण होईल यासाठी आपल्या सर्वांची बांधिलकी असणे ही आजची गरज असल्याचे पवार म्हणाले. या बांधिलकीच्या दिशेने मार्गाक्रमण कसे करता येईल, याचा विचार करणे हाच आपला उद्देश असल्याचे सांगताना यासाठी जेवढे करणे शक्य आहे, तेवढे करण्याचा प्रयत्न पुढील काळात सर्वांनी करत राहावे, असे आवाहन पवार साहेबांनी कृतज्ञता व्यक्त करताना केले.

या हृद्य सोहळ्यात कला, क्रीड, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत 'आधारवड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पवार यांचा आणि पत्नी सौ. प्रतिभा पवार यांचा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख