न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता?

24 Mar 2017 , 11:29:20 PM


गारपिटीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारी यांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांमार्फत मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. याबाबतीत पोलिसांनी काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धंनजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र अव्हाड, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे आणि विरोधी पक्षाचे अन्य आमदार यावेळी उपस्थित होते. भुसारी यांना जबर दुखापत झाली असून या शेतकऱ्याची साधी फिर्यादही दाखल केली गेली नाही, याउलट त्यालाच एका कैद्याप्रमाणे कैद करून ठेवले गेले. न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता? असा जाब यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी पोलिसांना केला. या आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर रामेश्वर भुसारी यांची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली.
दरम्यान, मंत्रालयात जिथे लोकांची कामे केली जायला हवीत, तिथे शेतकऱ्यांना मारहाण करण्यासारखे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. त्यामुळे याचा गंभीर विचार करण्याची गरज आली असून आमच्यासाठी हा विषय इथेच संपत नाही, आम्ही या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रश्न लावून धरू, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

संबंधित लेख