सरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे अश्रू दिसत नाहीत – आ. जितेंद्र आव्हाड

29 Mar 2017 , 09:26:27 PM


संघर्षयात्रेदरम्यान विरोधकांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पळसगाव येथून सुरुवात झाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पळसगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. बंडू करकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बंडू करकाडे यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आठवड्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.
हे सरकार संवेदनहीन बनत चालले असून सरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे अश्रू दिसत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची साधी भेट सरकारी पक्षातील सदस्यांना घेता येत नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेश राज्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले जाते, मात्र महाराष्ट्राचा विचारही केला जात नाही, त्यामुळे दिल्लीतले केंद्रसरकारही शेतकरी विरोधी आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. या सरकारला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही संघर्षाची सुरुवात केली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, बंडू करकाडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी पुढाकार घेतला असून त्यांचे संपूर्ण कर्जमाफ व्हावे, यासाठी संघर्षयात्रेत आवाज उठविणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केलेय.

संबंधित लेख