नेहरू सेंटर येथी हृद्य सोहळ्यात शरद पवार यांचा अमृतमहोत्सव संपन्न

12 Dec 2015 , 10:37:33 PM

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजे आदरणीय शरद पवार! शरद पवार साहेबांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा आज मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडला. अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने 'आधारवड' या चित्रपुस्तिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. याखेरीज उद्योग, चित्रपट, मिडिया आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, शिवसेना नेते मनोहर जोशी, या दिग्गजांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. याखेरीज उद्योगपती मुकेश अंबानी, राहुल बजाज, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, नाना पाटेकर, जब्बार पटेल, अभिनेता जितेंद्र चंदू बोर्डे आदि नानाविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी कार्यक्रमास उपस्थी राहून शरद पवार यांचे अभीष्टचिंतन केले. शरद पवार यांचे राजकीय पटलावरील स्थान आणि त्यांचे लोकाभिमुख व्यक्तिमत्वच यातून अधोरेखित होते.
 
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचानादिदी यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्या आयुष्यातील पंच्याहत्तर महत्त्वाच्या प्रसंगांचा समावेश असलेल्या 'आधारवड' या चित्रपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.  मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू अशा पाच भाषात आधारवड ही चित्रपुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. एक धुरंधर राजकारणी, मुसद्दी नेते, पुरोगामी  विचारांचे पुरस्कर्ते, महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, शेतीचे आधुनिकीकरण करणारे शेतितज्ज्ञ म्हणून शरद पवार ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यातील या अनेक पैलूंचा आणि महत्त्वाच्या घटनांचा आधारवड पुस्तकात समावेश आहे. 

आधारवड हा कार्यक्रम दोन भागात झाला. पहिल्या भागात राजकारणातील व्यक्तिंनी पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर दुसऱ्या भागात कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील व्यक्तिंनी आपल्या भावना प्रकट केल्या
याप्रसंगी बोलताना आदरणीय शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आभार मानले. सामान्यातील सामान्य व्यक्तीला मोठे करण्याची ताकद लोकशाहीमध्ये आहे. अशी ही लोकशाहीप्रणाली टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केले.  

व्यासपीठावरील मान्यवरांनी शरद पवार यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवारांसारखे नेते एका दिवसात होत नाहीत, त्यासाठी संघर्षाचा काल जावा लागतो, असे गौरवपर उद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. 'अविश्रांत मेहनत करणे हे पवारांचे कसब आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले तर पवारसाहेबांचे व्यक्तिमत्व तेंडुलकरांच्या 'हे सर्व येतं कुठून' पुस्तकाच्या शीर्षकासारखे आहे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. 'माझ्या करंगळीला पकडून पवारसाहेबांनी मला राजकारणात आणले, कधी देशाचा गृहमंत्री झालो कळलंच नाही' असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. तरुण राजकारण्यांसाठी पवार साहेब हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. 

'आधारवड' हा कार्यक्रम दोन भागात झाला. पहिल्या भागात राजकारणातील व्यक्तिंनी पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुसऱ्या भागाच कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, उद्योग अशा क्षेत्रातील महनीय व्यक्तींनी आपल्या भावना प्रकट केल्या. या कार्यक्रमातील पहिल्या भागाचे सूत्रसंचालन सुनिल बर्वे यांनी तर दुसऱ्या भागाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले. ईशस्तवन, स्वागतपरगीत तसेच राष्ट्रगीत सौ मृदुला दाढे- जोशी यांनी गायले.

संबंधित लेख