सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे- अजित पवार

30 Mar 2017 , 08:52:00 PM


शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना या सरकारने निलंबित केले. सरकारची उर्मटपणाची वागणूक लक्षात घेता या सरकारला सत्तेची नशा चढली आहे हे स्पष्ट होते. सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार यांनी बुधवारी केली. ते यवतमाळमधील सभेत बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ.राजेश टोपे व अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. केंद्राचे सरकार येऊन तीन वर्षे पूर्ण झाली. राज्याचे सरकार येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली. या काळात त्यांनी काय केले हे विचारणे विरोधकांचे कर्तव्य असल्याचे पवार म्हणाले. सरकार शेतकरी विरोधी आहे. यापूर्वी आघाडी सरकारने ७६ हजार कोटींचे कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला. शेतमालाला योग्य हमीभाव दिला. परंतु, कर्जमाफी राहिली बाजूला सरकार वाचविण्यासाठी या राज्यकर्त्यांनी १९ आमदारांना निलंबन केले, असा आरोप पवार यांनी केला.
दरम्यान सरकारने १९ आमदारांचे निलंबन करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय मात्र तुम्ही आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर आम्ही थेट जनतेशी जाऊन संवाद साधू, असा इशारा जयंत पाटील यांनी सरकारला दिला. या सरकारवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे, त्यामुळे या सरकारला हिसका दाखवण्याची वेळ आली आहे, असे पाटील म्हणाले.

संबंधित लेख