कर्जमाफीची मागणी करणाऱ्या १९ आमदारांना निलंबीत करण्याचे पाप या भाजप सरकारने केले आहे- जयंत पाटील

30 Mar 2017 , 09:21:16 PM


संघर्षयात्रेदरम्यान बुटीबोरी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बाजूने आपण उभे राहायलाच हवे या भावनेतून संघर्षयात्रा काढण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्याला सरकारकडून खूप अपेक्षा असतात. सलग तीन वर्षे राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता. मागील वर्षी पाऊस चांगला झाला, मात्र सरकारने नोटाबंदी आणली आणि शेतकरी आणखी अडचणीत सापडला. कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही दोन आठवडे आक्रमकपणे आंदोलन केले पण सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसली, असा आरोप पाटील यांनी केला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, कर्जमाफीची मागणी करणाऱ्या १९ आमदारांना निलंबीत करण्याचे पाप या भाजप सरकारने केलेय. शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा आवाज दाबण्यात येईल, असा संदेश भाजपने या कृत्यातून दिलाय. हे सरकार आल्यापासून तब्बल ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे आत्महत्या सत्र थांबावे म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कर्जमाफीनंतर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या. इतके मुजोर असे हे सरकार आहे. सरकारकडे राज्यात बुलेट ट्रेन आणण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे या सरकारला जागा दाखवणे गरजेचे आहे, असे आवाहन पाटील यांनी केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधा कृष्ण विखे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, अनिल देशमूख, जयदत्त क्षिरसागर, बाळासाहेब थोरात,, हर्षवर्धन पाटील  उपस्थित होते.

संबंधित लेख