मालेगाव येथील सभेत अजित पवार यांचे सरकारवर टीकास्त्र

01 Apr 2017 , 12:13:41 AM

संघर्षयात्रेच्या मालेगाव येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी शेतकरीवर्गाला संबोधित केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, अबू आझमी, आमदार अमीत झनक, गुलाबराव गावंडे आणि विरोधी पक्षाचे अन्य सदस्य उपस्थित होते. संघर्षयात्रा सुरू झाली त्याच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये सरकारने दिलेल्या मोठमोठ्या जाहिराती आम्ही पाहिल्या. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र शेतकऱ्यांना मदत करता येत नाही. स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे हे बरोबर जमते पण शेतकऱ्यांना मदत करणे या सरकारला जमत नाही, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले. दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ यासारख्या अनेक संकटांमुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशी नैसर्गिक संकटं सांगून येत नसतात. सरकारने शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. उद्योजकांना सांभाळणारे आणि शेतकऱ्यांना लाथाडणारे हे सरकार आहे, असा आरोप पवार यांनी केला. शेतकरी उभा राहिला तरच हवा तरच हे राज्य टिकेल. त्यामुळे शेतकऱ्यांला दिलासा मिळावा, त्याला उठून उभं राहण्यास मदत मिळावी, म्हणून ही संघर्षयात्रा काढली गेली आहे, असे पवार म्हणाले.

संबंधित लेख