महिला अभियंता हत्येप्रकरणी कारवाईची निरंजन डावखरे यांची विधान परिषद सभागृहात मागणी

01 Apr 2017 , 09:39:18 PM

राज्यशासनाच्या मनोधैर्य़ योजनेतून बलात्कार पिडीत महिला व मुलींना रुपये १० लाख इतकी नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी श्रीमती हुस्नबानू खलिफे व इतर वि.प.स. यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेदरम्यान पोलीसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे महिला अभियंता अंतरा दास हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजूर झाल्याची बाब अतिशय गंभीर असल्यामुळे याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याबाबतची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषद सभागृहात केली.

डिसेंबर २०१६ मध्ये कॅपजेमिनी कंपनीतील महिला अभियंता अंतरा दासची तळवडे एमआयडीसी परिसरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला बंगळुरुतून अटक करण्यात आली. सुरुवातीला देहू रोड पोलीस या हत्येचा तपास करीत होते. मात्र नंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. उपरोक्त प्रकरणी पोलीसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे महिला अभियंता अंतरा दास हत्या प्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजुर झाला असून तो राजरोसपणे मोकाट फिरत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. हा गंभीर प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हत्या सारख्या गुन्ह्यामध्ये ९० दिवस उलटूनही आरोपपत्र दाखल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे उत्तरादाखल सांगितले.

संबंधित लेख