संघर्षयात्रेची मंगळवेढा येथे जाहीर सभा

04 Apr 2017 , 06:14:57 PM

संघर्षयात्रेदरम्यान मंगळवेढा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, भारत भालके आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सलग सात अधिवेशने राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. या अधिवेशनात कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केली. भाजप सरकार आल्यापासून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पूर्वी विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत होते, आता पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होत आहेत, अशी राज्याची परिस्थिती झाली असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असल्याने कर्जमाफी देण्याची आमची मागणी आहे. यासाठी विधान भवनाच्या आवारात आम्ही आंदोलनही केलं. त्यासाठी आमच्या १९ आमदारांना निलंबीत करण्यात आले. आमच्याविरोधात आवाज केला तर तुमचा आवाज दाबण्यात येईल, ही दडपशाही वृत्ती सरकारच्या या कृतीतून दिसून येत आहे. 

निवडणुकांच्या काळात धनगर आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच जण धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत. मग यांनी आरक्षणाचे आश्वासन का दिले? आरक्षणाबात सरकार वेळकाढूपणा करत आहे. आम्ही एकत्र आलो म्हणून सरकार आम्हाला घाबरलं आणि ९ आमदारांचे निलंबन मागे घेतले. मग बाकीच्या १० जणांचे निलंबन मागे का घेतले जात नाही? शेतमालाला भाव मिळावा याच्याविरोधात हे सरकार आहे. शेतकऱ्यांना कसं अडचणीत आणायचं याच्या प्रयत्नात हे सरकार असतं, प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी यातच या सरकारचा वेळ जात आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. पंतप्रधान मोदी देशाला फसवतात मुख्यमंत्री फडणवीस राज्याला फसवतात. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेनेचे प्रत्येक धोरण तळ्यात-मळ्यात असते. कधी ते भाजपला सोडतात तर कधी धरतात. पण अशा कोणत्याही भूलथापांना बळी  न पडता आम्ही संघर्षयात्रेद्वारे सुरू केलेला संघर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत सुरूच ठेवू, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख