कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन व पूर्णाकृती पुतळयाचा अनावरण समारंभ

04 Apr 2017 , 10:12:03 PM

कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन व पूर्णाकृती पुतळयाचा अनावरण समारंभ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. आपल्याबरोबर ४० वर्षे काम केलेल्या एका जुन्या ज्येष्ठ सहकार्‍याच्या स्मारकाचे उद्‌घाटन आज मी करत असून यावेळी अंकुशरावांच्या अनेक स्मृती मनात जाग्या होत असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. अंकुशराव एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नसत. त्यांनी कारखाने उभारले, अनेक शाळा, महाविद्यालये काढली. या संस्था अत्यंत शिस्तबद्धपणे त्यांनी चालविल्या. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता, आयुष्यभर त्यांनी माणसे जोडली. अंकुशरावांनी अत्यंत जोमाने आणि आत्मविश्वासाने विधायक कामे केली, असा गौरव पवार यांनी केला.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार राजेश टोपे म्हणाले की, कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन व्हावे अशी जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे आज आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या साक्षीने हे उद्‌घाटन झाले आहे.  मा. पवार साहेब आणि टोपे साहेब हे दोघे जवळपास अर्धेशतक राजकारणात व समाजकारणात सतत सोबत होते.  परस्परांच्या कार्याचे ते साथीदार आणि साक्षीदार होते. पवार साहेबांवर स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेबांची व्यक्तीगत श्रध्दा होती. यशवंतरावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील आणि पवार साहेबांच्या राजकीय व सामाजिक विचारांशी एकनिष्ठ राहून टोपे साहेबांनी प्रचंड रचनात्मक काम केले. स्वर्गीय टोपे साहेबांचे संस्कार घेऊन मी राजकारणात आलो, राजकीय सत्तेचा वापर अधिकाधिक रचनात्मक, विधायक लोककल्याणकारी कामासाठी केला पाहिजे  हाच विचार जपण्याचे काम मी करत आहे.  जनतेने प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवावा एवढीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंकुशराव टोपे साहेबांचे स्मृतीस्थळ हे फक्त जालन्यापुरते मर्यादीत न राहता ते मराठवाडयातील तरुणांना प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठवाडयामध्ये त्यांनी पाणी, सहकार  व शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. येणार्‍या पिढीला अंकुशरावांचे हे काम निश्चीतच प्रेरणा देईल, असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.

संबंधित लेख