विधीमंडळात आदरणीय शरद पवार यांचे अभीष्टचिंतन

21 Dec 2015 , 07:28:26 PM


विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज आदरणीय शरद पवार यांचा अभीष्टचिंतनाचा ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत आदरणीय शरद पवारसाहेबांच्या अभीष्टचिंतनाचा ठराव मांडला. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेतील प्रागतिक नेतृत्त्व म्हणजे शरद पवार साहेब, असे गौरवोद्गार यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काढले. पवारसाहेबांसारखा प्रागतिक विचार सभागृहात असलेल्या सदस्यांनी अंगिकारला पाहिजे, असेही ते म्हणाले. राजकीयदृष्ट्या आमची मते वेगळी असली तरी पवारांचे राजकीय कार्य कोणालाच नाकारता येणार नाही. त्यांच्यासारखा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा शरद पवार समर्थपणे चालवत आहेत. गेली २५ वर्षे राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना त्यांनी राजकरणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पवारांनी आपल्या ‘टर्म्स’ वर राजकारण केले. देशात असा कोणताच पक्ष वा नेता नाही ज्यांच्याशी पवारसाहेबांचे सौहार्द्रपूर्ण संबंध नाहीत. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा वेगळा पक्ष काढल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपेल, असे भविष्य वर्तवले गेले. पण नव्या पक्षालाही त्यांनी यश मिळवून दिले, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारसाहेबांची स्तुती केली. 

१९८४ मध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या लोकप्रियतेची प्रचंड लाट असताना, त्यांच्या खालोखाल दुसऱ्या  क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम शरद पवार यांनी केला. बेळगावच्या सीमा आंदोलनात सहभागी झालेले असताना पवारांनी प्रसंगी मारदेखील खाल्ला. त्यांचे वळ पाहून एस.एम.जोशींनादेखील रडू आले, अशा आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. आपल्या वडिलांच्या आजारपणात वडिलांनी देशातच उपचार घेतले असले, तरी पवार साहेबांनी आंतरराष्ट्रीय उपचारासाठी सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणाची मदत देऊ केली होती, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

युपीए सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले काम वाखणण्यासारखे आहे. युपीएचे ते एकप्रकारे ‘ट्रबल शटर’च होते, असे फडणवीस पुढे म्हणाले. सतत संशोधनाचा ध्यास घेतलेले पवार हे एकमेव कृषिमंत्री होते. शेतीमालाच्या उत्पादनात आणि निर्यातीत उच्चांक गाठण्याचे काम त्यांनी कृषिमंत्री असताना केले. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातदेखील त्यांचे कार्य निर्विवाद आहे. नैसर्गिक, मानवी आणि राजकीय आपत्तींना त्यांनी योग्यप्रकारे हाताळले असे मुख्यमंत्री म्हणाले.

क्रीडाक्षेत्रातही शरद पवार यांचे भरीव योगदान आहे. क्रिकेटप्रमाणेच कबड्डी, खोखो आणि कुस्तीलाही त्यांनी बरीच मदत मिळवून दिली. महेंद्रसिंग धोणीसारखा गुणी कप्तान पवारांमुळेच भारतीय क्रिकेट टीमला लाभला, असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

"मी जो आहे, जिथे आहे, जसा आहे त्यात पवार साहेबांचा मोलाचा आधार मला आहे," अशा शब्दांत पवार साहेबांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी गौरवोद्गार काढले. मतभेदांचे मनभेदात रुपांतर होऊ देऊ नये, याचा धडा आपल्याला पवार साहेबांनी दिला असल्याचे सांगतानाच राष्टवादीच्यावतीने साहेबांबद्दल बोलण्यास माझ्यासारखाला संधी दिली याबद्दल मी अजितदादांचा आभारी आहे असे आव्हाड म्हणाले. ऑपरेशनच्या काही दिवसांनंतरच पवार साहेब भंडाराच्या ४५ डिग्रीमध्ये भाषण करण्यासाठी आले. लातूर, भुजमधल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जशी पवार साहेबांनी यंत्रणा राबवून परिस्थिती सुधारली, तसेच उत्तराखंडाला उभे करण्याचे कामही त्यांनीच केले होते असेही आव्हाड म्हणाले.

विरोधकांचाही काही दोष नसताना माध्यमातून आरोप झाले तर पवारांनी आपल्या विरोधकांचीही बाजू प्रसंगी घेतलेली आहे. डिफेन्स मिनिस्टर असताना महिलांना वैमानिक होण्याचा मान पवार साहेबांनी दिला. २००४ ला त्यांच्या मनात आणतील ते खाते त्यांना मिळाले असते. पण काळ्या आईची आणि बळीराजाची सेवा करण्यासाठी त्यांनी कृषीखाते घेतले. त्याचे सकारात्मक निकाल सर्व देशाला दिसले आहेत. बाबरी मशीदच्या घटनेवेळी विध्वंस रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरसिंह रावांनी आरएसएसशी बोलण्याची जबाबदारी पवार साहेबांवर टाकली होती. बेळगाव महाराष्ट्रात यावा यासाठी पवार साहेबांनी पूर्ण प्रक्रिया बनवली होती, पण केवळ लाँग टर्म राजकारण करता यावे यासाठी पवारांच्या योजनेला विरोध केला गेला. गोवा वेगळे राज्य करण्यासाठी घेतलेल्या जनमत चाचणीसाठी कमी वय असूनही पवार साहेबांवर ऑब्जरवरची जबाबदारी दिली होती. मराठवाडा नामांतराच्यावेळी सत्ता जाण्याची भीती दाखवली गेली. पण सत्ता जाऊनही त्यांनी विद्यापीठाचा नामविस्तार केलाच, अशा आठवणी  आव्हाड यांनी सांगितल्या.
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी पवार साहेबांबद्दल बोलताना अफाट वाचन आणि अफाट लोकसंग्रह हे यशवंतराव चव्हाण यांचे गुण पवार साहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणले. सत्तेवर नसतानाही दिल्ली येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमाला इतक्या दिग्गजांच्या सोबतच सामान्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते, यावरूनच त्यांचे मोठेपण दिसून येते. राजकारणातही भावनिक ओलावा असतो, याचे देशातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री असे शिवसेनेचे एकनाथ शिंदे म्हणाले.

३८व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची जबाबदारी घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे वेगवेगळ्या माध्यमातून पेलली. कापसाला भाव मिळावा यासाठी पायी दिंडी काढणारे शरद पवार त्याकाळात स्वतः शेवटपर्यंत दिंडीत चालले होते. महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे आणण्याचे काम फक्त पवार साहेबांनी केले. देशातली सर्वांत मोठी आणि धाडसी अशी ७० हजार कोटींची कर्जमाफी त्यांनी केली. हा निर्णय नुसताच घेतला नाही तर तो देशाला पटवून दिला. असे गौरवोद्गार भाजपचे कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनिल तटकरे यांनी आदरणीय पवार यांच्याविषयी भावना व्यक्त करताना आजवर १४ निवडणुका लढवून अपराजित राहीलेले एकमेव नेते म्हणजे पवार साहेब असे आमदार सुनिल तटकरे म्हटले. संघटनेच्या कामासाठी एसटी, ट्रेनमध्ये प्रवास करत, हॉटेल, सर्किटहाऊसमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरीच भाकरी खाऊन संघटना वाढवण्याचे काम त्याकाळी पवार साहेबांनी केल्याचे तटकरे म्हणाले. फळप्रक्रिया, शेतीपूरक उद्योग वाढण्यासाठी पवार साहेबांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पुलोदचे सरकार पडल्याच्या दुसर्याफ दिवशी पवार साहेब स्वतःची फियाट गाडी चालवत ब्रेबॉर्न वर टेस्ट मॅच पाहायला गेले. तेव्हाची खिलाडू वृत्ती पाहून संपूर्ण स्टेडिअमने उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले होते, अशी आठवणही तटकरे यांनी सांगितली. महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य महाराष्ट्र होते, आणि पहिले मुख्यमंत्री पवार साहेब होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यास सर्वसमंती नव्हती. पण साहेबांनी धाडसाने हा निर्णय अमलात आणला. शरद पवार यांनी राजकारणच केले नाही तर कला, साहित्य, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रात त्यांनी मुक्त संचार केला. तिथले लोक जोडले. १९९९ साली विचारांशी तडजोड न करता फारकत घेऊन राष्ट्रवादीची स्थापना त्यांनी केली. म्हणूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली. २००१ मध्ये गुजरात मध्ये भूकंप झाला तेव्हा, ७५० खासदारांपैकी केवळ एक खासदार आपत्ती व्यवस्थापनासाठी पुढे आलाय, असे गौरवोद्गार तेव्हाचे प्रधानमंत्री अटलजीनी पवार साहेबांबद्दल काढले होते, असे तटकरे म्हणाले. देशाचे सर्व ज्येष्ठ महनीय व्यक्ती एका व्यासपीठावर येण्याचे श्रेय सुद्धा पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला जाते. जसे दिल्लीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले तसे मुंबईत उद्धव-राज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले. हे साहेबांच्या नेतृत्वाचाच परिणाम आहे. देशाच्या, राज्याच्या राजकारणात एक अढळस्थान साहेबांचे आहे आणि राहील. देशाचे राष्ट्रपती सलाम मुंबई, सलाम शरद पवार साहेब म्हणतात, यावरूनच साहेबांची उंची कळून येते असे सांगतानाच त्यांना उदंड आयुष्य मिळो, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आत्ताच्या पिढीतूनही त्यांच्याहातून घडो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ यांनी पवार साहेबांबद्दल भावना व्यक्त करताना मुंबई बॉम्बस्फोट झाल्यानंतर ४८ तासात परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे काम त्यांनी केले होते. नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साखर संघ, विद्या प्रतिष्ठान यासारख्या रचनात्मक काम करणाऱ्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. रयत शिक्षण संस्थेमध्येही त्यांनी आपले मौल्यवान योगदान दिले. राजकीय विरोधक असले तरी शत्रुत्वाची भावना न ठेवता विकासाचे राजकारण सातत्याने केले, असेही भुजबळ म्हणाले.

शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्कारावेळी पक्षप्रमुखासहीत आम्ही सर्व शोकाकुल झाले असताना पवार साहेब स्वतः उभे राहून औपचारिकता पार पाडत होते, ही आठवण संगताना खऱ्या अर्थाने आम्हाला त्यावेळी त्यांने सांभाळून घेतले होते असे त्या म्हणाल्या.

राजकारणात स्वतः च्या नावापुढे राव, दादा, साहेब लावणारे खुप पाहिले, पण फक्त शरद पवार असे लिहिणारे एकमेव नेते मी पाहिले असे गौरवोद्गार भाजपच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. आपण पवार साहेबांच्या प्रत्येक वक्तव्याचा, भाषणाचा बारकाईने अभ्यास करतो असंही त्या म्हणाल्या.

१२ मार्चला स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे. त्यावेळी दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावून शरद पवार यांच्या तोंडूनच नव्या पिढिला चव्हाण साहेबांचे विचार ऐकण्याची संधी द्यावी, अशी विनंती विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहाला केली. माझ्यासारख्या तरूणाला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देऊन त्यांची अधुरी स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आमच्यावर सोपवली आहे असे मुंडे यांनी म्हटले. ९५ साली पुण्यात शिक्षणासाठी बारामती हॉस्टेलला असल्यापासून आपल्याला पवारसाहेबांचे आकर्षण होते. पवार- मुंडे कुटुंबात संघर्ष असतानाही पवार साहेब यांना प्रथम ९६ साली भेटलो तेव्हाही त्यांनी कटूता न दाखवता त्यांनी आस्थेवाईक पणे चौकशी केली, असे मुंडे यांनी सांगितले. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली तेव्हा साहेब कृषीमंत्री होते. सलग दोन दिवसांचा मराठवाडा दौरा केल्यानंतर पंधरा दिवसांत सरकारतर्फे मदत मिळवून दिली होती. पूर्वीच्या पक्षापासून विभक्त होतांना आधी घराला प्राधान्य दे असाच सल्ला पवार साहेब यांनी दिला, असेही मुंडे म्हणाले. 


संबंधित लेख