कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा जळगावात ठिय्या

12 Apr 2017 , 10:44:11 PM

रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचे सहा तास आंदोलन, आंदोलकांच्या दबावापुढे जिल्हाधिकारी नमले

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीसहीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेससह, काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेकाप, कवाडे गट पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्ते निवदेन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता पोलिस निरीक्षक यांच्याशी वाद झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवदेन स्वीकारावे, अशी भूमिका घेतली. या मागणीसाठी आंदोलकांनी दुपारी ४ ते रात्री ९.३० वाजेपर्यत सुमारे सहा तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर आंदोलकांच्या दबावापुढे झुकत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातून बाहेर येऊन कर्जमाफीच्या मागणीबाबतचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात महिलादेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याचे कळल्यावर या महिला कार्यकर्त्यांनी हातातील बांगड्या दाखवत आपला निषेध नोंदवला. 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, काँग्रेसचे डी. जी पाटील, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी मंगला पाटील,कल्पना पाटील,मीनल पाटील,नगरसेविका लता मोरे, जि.प.सदस्य डॉ. निलम पाटील यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख