बारामती येथे खा. शरद पवार यांचा गौरव सोहळा संपन्न

14 Apr 2017 , 11:42:05 PM

बारामती तालुका शहर नागरी गौरव समारंभ समितीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा सत्कार सोहळा गुरुवारी बारामती येथे आयोजित करण्यात आला. शरद पवार यांच्या संसदिय कारकिर्दीची पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण झाली, तसेच भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे, अशा दुहेरी सुवर्णयोगाचे औचित्य साधून या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले गेले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बारामतीकरांकडून माझा सन्मान होतोय, यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही, अशा शब्दात पवार यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. आज बारामती शैक्षणिक कामगिरीसाठी महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. तुम्ही माझ्या पाठीशी ताकदीनीशी उभे राहिलात म्हणूनच हे शक्य झाले, ज्या एकजुटीने तुम्ही माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात, तसेच यापुढेही राहा. राज्याचा, देशाचा चेहरा बदलण्यासाठी आपण सगळे एकजुटीने काम करू, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण, जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्ष सौ.पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले उपस्थित होते.

संबंधित लेख