संघर्षयात्रेने दिली नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

17 Apr 2017 , 11:50:50 PM

संघर्षयात्रेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संघर्षयात्रेचा उद्देश पुनश्च स्पष्ट केला. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती पण या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली, असा आरोप पवार यांनी केला. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलाय, मोडकळीस आलाय. कर्जाच्या जाचाला कंटाळून तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, यापेक्षा दुःखद गोष्ट असू शकत नाही असे सांगतानाच नाशिक जिल्ह्यात ५ पैशांनी कांदा विकला जातोय, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सरकारला धडा शिकवण्यासाठी ही संघर्षयात्रा आयोजित केली आहे. हा लढा आपल्याला आणखी तीव्र करायचा आहे, सरकारविरोधातील या लढ्याला एकमताने पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
 
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, प्रा. जोगेंद्र कवाडे, अबू आझमी, दिपीका चव्हाण, सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार उपस्थित होते. 

संबंधित लेख