कांद्याला एक रुपया अनुदान देणाऱ्या सरकारच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का? - अजित पवार

18 Apr 2017 , 12:31:58 AM

कांद्याला एक रुपया अनुदान देणाऱ्या सरकारच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का? शेतकरी जमातीचा माणूस सत्तेत नसल्याने काय होतं ते गेल्या तीन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. आज शेतकरी अडचणीत असताना कोणीच त्याच्या मदतीला धावून जात नाही, शेतकरी नेते सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री झाल्यानंतर कुठे आहेत? त्यांना आता सत्तेची हवा लागली, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सटाणा येथे केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संघर्षयात्रेच्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आता निवडणुका घ्याव्यात, जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवेल, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, हनुमंत डोळस, प्रा. जोगेंद्र कवाडे, अबू आझमी, दिपीका चव्हाण, सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार उपस्थित होते.

संबंधित लेख