राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जानेवारीमध्ये राज्यभरात निघणार मोर्चे

29 Dec 2015 , 04:34:06 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्याच्या सर्व भागात पुढील महिन्यात मोर्चे काढले जाणार आहेत. याची माहिती आज प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत दिली. नव्या वर्षात पुढीलप्रमाणे मोर्चे होणार आहेत.

- दि. ४ जानेवारी, रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय

- दि. ६ जानेवारी, जळगाव विद्यापीठ 

- दि. १५ जानेवारी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा मिळून नाशिक विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष यांनी काही राज्यनिहाय तर काही विभागवार विद्यार्थ्यांच्या समस्यांचा आढाव घेतला. यात प्रामुख्याने पुढील मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या निमित्ताने शासनाला देण्याचे ठरले आहे.

- राज्यात फ्री शिप, स्कॉलरशिपसाठी लाभ घेण्यासाठी ओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना साडे चार लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे. ही मर्यादा वाढवून सहा लाख करावी.

- सध्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफीसाठी जे निकष लावले आहेत, ते बदलावेत अशी मागणी आहे. यात प्रामुख्याने नापास झालेल्या विद्यार्थ्याला मदत मिळत नाही. तसेच ज्यांना स्कॉलरशिप आहे त्यांनाही मदत नाही. हे दोन्ही निकष बदलावेत.

- विद्यापीठ कायदा सर्वसमावेशक नसून त्यात बदल करावा. राज्यात चार विद्या शाखा आहेत. त्यात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. विद्यापीठाचा मुळ उद्देश ज्ञानाची निर्मिती, ज्ञानाचे जतन आणि ज्ञानाचा प्रसार करणे आहे. परंतु विद्यापीठे इतर गोष्टीच करण्यात व्यस्त आहेत. या संपुर्ण विषयावर साधक बाधक चर्चा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

- युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांच्या जाहीराती बऱ्याच कालावधीपासून प्रसारित झालेल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणि धास्ती निर्माण झाली आहे. शासनाने त्वरीत दोन्ही आयोगाच्या रिक्ता जागांसाठी जाहिराती काढाव्यात.

- काही तांत्रिक कारणे पुढे करून बऱ्याच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अडकवल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तांत्रिक कारणे दूर करून अथवा वेगळ्या पर्यायांचा वापर करून थकलेल्या स्कॉलरशिप त्वरीत द्याव्यात.

संबंधित लेख