सरकारला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे – सुनील तटकरे

26 Apr 2017 , 12:35:57 AM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा आज कोल्हापूरातून सुरू झाला. कोल्हापूरच्या दसरा चौक येथे झालेल्या सभेत विरोधकांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील,  आ. जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, विद्या चव्हाण, सुनील केदार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

आम्ही संघर्षयात्रा शेतकऱ्यांसाठी काढली आहे, सत्तेची मस्ती या सरकारच्या डोक्यात शिरली आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तर जयंत पाटील म्हणाले की, ज्यांना जनतेने निवडून दिलं त्या मंडळींना सर्वसामान्यांकडे पाहण्यासही वेळ नाही. पण तुमचं आणि आमचं नातं अतूट आहे, त्यामुळे आपण मिळून सरकारविरुद्धचा हा संघर्ष सुरू ठेवायचा आहे. तसेच कोल्हापूरने नेहमीच राज्याला दिशा दाखवण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

संबंधित लेख