आर.आर.आबांचे विचार संघर्षयात्रेच्या माध्यमातून पुढे नेऊया - अजित पवार

26 Apr 2017 , 11:55:34 PM

सांगली येथील संघर्षयात्रेच्या प्रवासात नेहमी आर.आर.आबांची आठवण येते. सर्वसामान्यांवर अन्याय झाला की आबा चिडून उठायचे. ते आज असते तर त्यांनी सडेतोड भाषणाने सत्ताधाऱ्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढलं असतं. सर्वसामान्यांच्या हितासाठीचे आबांचे हेच विचार आज पुढे नेण्याची गरज आहे, अशा शब्दांत सांगली येथील कवठेमहांकाळ येथे झालेल्या संघर्षयात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्व. आर.आर.पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. विद्या चव्हाण, दिलीप सोपल, प्रकाश गजभिये, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अबू आझमी, सुनील केदार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.
 
 सरकारमधील लोक कोणताही निर्णय घेताना आधी एक खडा टाकून बघतात जर विरोध झाला तर लगेच आपल्या भूमिकेवरून घुमजाव घेतात अन्यथा विरोध न झाल्स जनतेवर निर्णय लादतात, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. आम्ही कर्जमाफीची मागणी करतो आहेत ती चुकीची आहे का? राज्यातील शेतकरी अडचणीत नाहीये का? सरकारने शेतकऱ्यांसाठी काही धोरणे आणली आहे का?  असे प्रश्न त्यांनी जनतेला विचारले. म्हणूनच कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आपण अविरतपणे संघर्ष सुरू ठेवूया, असे आबाहन त्यांनी जनतेला केले. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी डरकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोडत होते, आता भाजपने त्या वाघाची पार शेळी करून टाकली, असा टोलाही पवार यांनी लगावला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची मागणी करावी आणि ती मान्य न झाल्यास राजीनामे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.

दरम्यान, यावेळी बोलताना गटनेते जयंत पाटील म्हणाले की, दुष्काळ काय असतो हे कवठेमहांकाळ भागाने अनुभवलं आहे. पाण्यासाठी कवठेमहांकाळने चार दशकं संघर्ष केला, त्यामुळे या संघर्षयात्रेच्या भावना येथील लोक समजू शकतात. तसेच, वीज दरवाढीविरोधात २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्रितपणे मोर्चा काढून दरवाढ कमी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकूया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

संबंधित लेख