शेतकऱ्यांच्या दुर्गतीला भाजप सरकार जबाबदार - सुनील तटकरे

27 Apr 2017 , 07:56:19 PM

कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचा अभ्यास करावा लागतो ही शोकांतिका आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री माननीय स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची ही प्रतारणा आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कराडमध्ये केली. ते स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात बोलत होते. राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या या दुर्गतीला सरकार जबाबदार आहे, म्हणूनच या सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार आम्ही केलाय आणि हा वैचारिक लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार कार्यालयात तूरडाळ वाटून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येक घटकाला केले.
 
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात याआधी राबवल्या गेलेल्या दूरदर्शी धोरणांवर भाष्य केले. सत्ता सर्वसामान्यांच्या विकासासाठी असते, हे स्व. यशवंतराव चव्हाण आणि राज्यातील इतर दिग्गज नेत्यांनी दाखवून दिले म्हणूनच आपला हा प्रदेश इतका संपन्न होऊ शकल्याचे ते म्हणाले. अशा संपन्न राज्यात शेतकऱ्यास कर्जबाजारी व्हावे लागते हे राज्याचं दुर्दैव आहे. मी राजकारणसाठी इथे नाही मी शेतकऱ्यांसाठी इथं आलोय, असे वक्तव्य त्यांनी केले.
 
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ.शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, पतंगराव कदम, संजय दत्त, दिलीप सोपल, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, प्रणिती शिंदे, सुनील केदार, अबू आझमी आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख