शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार म्हणे, सरकारला शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का? – सुनिल तटकरे

02 May 2017 , 06:34:49 PM

आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या तिस-या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी साताऱ्यातील गांधी मैदान येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.

मुख्यमंत्री आता संघर्षयात्रेला घाबरले आहेत. त्यांचं आसन अस्थिर होतं की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आता संवाद यात्रा काढणार असे ऐकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी सांगितले. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार पण यांना शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का, असा प्रश्न विचारून तटकरे यांनी सरकारच्या दिखावुपणाची खिल्ली उडवली. आम्ही संघर्षयात्रा करून थांबणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, जोपर्यंत शेतमालाला भाव मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांची तूर विकत घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हे सरकार सगळा दोष मागील सरकारवर ढकलून मोकळं होतं. पण याआधी शेतकऱ्यांशी बांधिलकी असलेलं सरकार कार्यरत होतं. आताचं चित्र मात्र वेगळं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार या ठिकाणी म्हणाले. हा संघर्षाचा काळ आहे. महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिल्लीतही शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. हे सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे. पुढच्या निवडणुका लागतील तेव्हा राज्यावर पाच लाख कोटींच्यावर कर्ज असेल. मग शेतकऱ्यांना का कर्जमाफी दिली जात नाही, असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि विरोधीपक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख