'तूरी'च्या संकटाला च'तूर' मुख्यमंत्री जबाबदार - धनंजय मुंडे

02 May 2017 , 06:55:54 PM

तुरखरेदीच्या संदर्भातील राज्य शासनाची भूमिका म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव नाही, तर शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक चालवलेला छळ आहे. २२ एप्रिलला राज्यातली तूरखरेदी केंद्र अचानक बंद करुन शासनानं शेतकऱ्यांवर 'सुलतानी' संकट आणलं. त्यानंतर काढलेल्या तूरखरेदीच्या शासन निर्णयात शेतकऱ्यांवर अनेक जाचक अटी लादून, फौजदारी कारवाईची धमकी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तूरखरेदीचा कुठलाही इरादा नसल्याचे संकेत दिले आहेत, तुरीच्या संकटाला च'तूर' मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
शासनाने तूरखरेदीच्या शासननिर्णयातील जाचक अटी रद्द करुन सुधारित शासननिर्णय तात्काळ जारी करावा, तसेच शेतकऱ्यांना हमीभावावर प्रतिक्विंटल ४५० रुपये बोनस देऊन आठ दिवसात तूरखरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी आज केली.

राज्यात तूरखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचे सुरु असलेले हाल व त्यासंदर्भात विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर व अकार्यक्षम, बेजबाबदार कारभाराचे वाभाडे काढले.

संबंधित लेख