एका क्लिकवर पहा शरद पवारांचा चित्रमय जीवनपट...

02 May 2017 , 07:19:26 PM

आतापर्यंतचे सर्व फोटो, विडियोचे संकलन

खासदार शरद पवार साहेबांच्या सक्रिय राजकिय कारकिर्दिला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याआधी २०१५ साली साहेबांचा अमृतमहोत्सवी सोहळा दिल्लीसह राज्यभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दोन वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात जवळपास हजार एक कार्यक्रम संपन्न झाले. साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अनेक दैनिकांनी पुरवण्या, वृत्तवाहिन्यावर खास कार्यक्रम, नियतकालिके आणि विशेषांक यानिमित्ताने काढले. हे सर्व होत असताना कमतरता भासत होती ती साहेबांच्या कार्याची साक्ष देणाऱ्या फोटोज, विडियोजची... वृत्तपत्रे, वाहिन्या आणि राज्यभरातील कार्यक्रमांचे आयोजक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षकार्यालयाकडे वारंवार साहेबांच्या जुन्या, महत्त्चाच्या फोटोजची मागणी करत होते. अशा छायाचित्रांचे एकत्रित संकलन नसल्यामुळे छायाचित्र देणे शक्य होत नव्हते. साहेबांनी विविध क्षेत्रात दिलेले अतुलनीय योगदान सर्वपरिचित आहेच, पण या योगदानाचा सचित्र आढावा नव्या पिढिसमोर आणण्यासाठी खासदार सुप्रियाताईंच्या संकल्पनेतून www.sharadpawarimages.com या वेबसाईटचे काम हाती घेण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नीलेश राऊत यांनी पवार साहेबांचे आतापर्यंतचे सर्व फोटो, विडियोजच्या संकलनाची जबाबदारी घेतली. साहेबांचे कौटुंबिक जीवन, राजकीय, सामाजिक, अराजकीय अशा सर्व क्षणांचे जवळपास दोन हजार फोटो राऊत यांनी संकलित केले आहेत. नितीन काळेल यांनी या वेबसाईटची निर्मिती केली. फोटो, विडियो वेबसाईटवर अपलोड करणे, फोटो एडिटिंग करुन त्याला हाय डेफिनेशनमध्ये संस्कारीत करण्याचे कामही त्यांनी केले आहे. प्रत्येक फोटो, विडियो सोबत फोटोकॅप्शन देण्यात आली आहे. एखाद्या विशिष्ट घटनेचा फोटो हवा असल्यास टॅग नुसार फोटो सर्च करण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे.

वेबसाईटसाठी वर्षभरापासून फोटो संग्रहीत करण्याचे काम चालू होते. सध्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. साहेबांचे आयुष्य समुद्रासारखे आहे, त्यांचे दहा हजार हून अधिक फोटो असू शकतील अशी शक्यता राऊत यांनी बोलून दाखवली. पुढचे तीन वर्ष हे काम चालणार असून तीन टप्प्यांत वेबसाईटवर ते अपलोड केले जातील, अशीही माहिती त्यांनी दिली.

संबंधित लेख