राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला - युवती कार्यकर्त्यांची मंत्रालयात धडक; मुख्यमंत्री दालनाबाहेर कांदे फेकून सरकारविरोधात घोषणाबाजी

03 May 2017 , 10:53:49 PM

दौंड तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आपल्या शेतातील कांद्याचे उभे पिक ट्रॅक्टरने जमिनीत गाडून टाकल्याची घटना नुकतीच घडली. याधीही नाशिकमधल्या नगरसूल येथेही एका शेतकऱ्याने पाच एकरावरील कांदा जाळून टाकला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दाहक स्थिती शासनासमोर मांडली होती. 
तरिही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तसेच शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवती कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे याबाबतचे निवेदन तसेच दत्तात्रय शिंदे यांच्या शेतातील कांदे मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या दालना बाहेर कांदे फेक करत मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, युवती मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे, स्वाती माने आणि अन्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणे विचार करत शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात केले आहे.

संबंधित लेख