मराठवाड्यातील युवकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठा लढा उभारणार - संग्राम कोते पाटील

09 May 2017 , 10:32:07 PM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा औरंगबाद येथे युवक मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी पार पाडत असताना सर्वात जास्त काम मराठवाडा विभागात झाले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी, मेसची फी भरता यावी यासाठी मदत करण्याचे आंदोलनही मराठवाड्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर याआधी करण्यात आले आहे.

युवक संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे कोते पाटील यांनी या बैठकीत सांगितले. आज भाजपमध्ये जे मंत्री झाले आहेत ते विरोधात असताना शेतमालाला भाव मिळण्यासाठी उपोषण, आंदोलन करत होते. आज कापूस, सोयाबिन, तूरीला भाव मिळत नाही. धनगर-मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारतर्फे कुणीच बोलायला तयार नाही. मराठा आरक्षणासाठी तर यांना वकीलसुद्धा मिळाला नाही, हे सर्व प्रश्न युवकांशी निगडीत आहेत. या सर्व प्रश्नांवर मोठा लढा येत्या काळात उभारू, अशी भूमिका या बैठकीत कोते पाटील यांनी मांडली.

या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष कादिर मौलाना, प्रदेश चिटणीस विजय भिसे, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, बीड जिल्हा युवक अध्यक्ष शफिक शेख, औरंगाबाद युवक शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, राहुल तायडे, संदेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख